फोडणीची पोळी

फोडणीची पोळी

“This is not what I had planned; but perhaps the story you finish is never the one you begin.” – Salman Rushdie, Midnight’s Children
आज सकाळी तशी थोडी उशीराच जाग आली. कालची पार्टी नाही म्हणली तरी बर्यापैकीच झाली होती! खरंतर एकूण २०२० हे वर्ष जसं गेलं त्यावरून तर मी तरी ठरवलं होतं की पार्टी नाही करायची. पण दुपारी उगीचच काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं! गेली जवळजवळ दहा वर्षं तरी दरवर्षी ३१ डिसेंबरला पार्टी ही ठरलेलीच! कधी कॉलेजचे मित्र, कधी शाळेतले मित्र, कधी घरीच, पण सेलेब्रेशन नाही असं कधीच झालं नव्हतं. मग घरच्या घरीच थोडी चर्चा झाली आणि पिझ्झा बनवायचा आणि आईस्क्रीम मागवायचा बेत झाला आणि शेवटी पार्टी झाली! बारा वाजेपर्यंत न जागताच झोपलोही असतो पण जेवण उशिरा झालेलं म्हणून जागलो.
त्यामुळे सकाळी उशिरा जाग आली. त्यात हल्ली ठाण्यातही छान थंडी आहे त्यामुळे कधी कधी उठावसं वाटतच नाही! मस्त तसंच पडून रहाव वाटत. असंच थोडावेळ लोळून उठलो आणि आवरून बाहेर आलो तर आई-बाबांचा नाश्ता झाला होता! आंबोळीचं साहित्य ओट्यावर ठेवलेलं होतं. हिनी आंबोळी बनवायला घेतली आणि म्हणली बस तुला गरम वाढते. पण मला जरा काहीतरी चमचमीत खायचा मूड होता! तेवढ्यात माझं लक्ष पोळीच्या डब्याकडे गेलं आणि डोक्यात एकदम ट्यूब पेटली! काल पिझ्झा खाल्लेला सगळ्यांनी त्यामुळे चांगल्या ४-५ पोळ्या उरलेल्या! म्हणलं चला आपला नाश्त्याचा प्रश्न सुटला – फोचीपो अर्थात फोडणीची पोळी!!
फोडणीची  पोळी म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय! जगात नाश्त्याचे कितीही नवीन प्रकार आले ना, तरी कांदेपोहे आणि फोडणीची पोळी ह्या दोन गोष्टी मी अगदी रोजही खाऊ शकतो! त्यात पोहे कसे घरात असतात, म्हणजे आपले जाड पोहे हो. फोडणीच्या पोळीसाठी आदल्या दिवशी बनवलेल्या पोळ्या उरल्या पाहिजेत ही अट असल्यामुळे ती मला थोडी जास्तच आवडते. मला आठवतंय मी पाचवीत होतो तेव्हाची गोष्ट. सकाळची शाळा सुटली की मी बहुदा घरी न येता परस्पर माझा जिगरी दोस्त परश्याकडे जात असे. किंवा घरी आलोच तरी दप्तर टाकून लगेच त्याच्याकडे धूम ठोकत असे. एकदा असाच मी त्याचाकडे गेलो असताना आम्हा दोघांनाही अचानक कडाडून भूक लागली. नेहमी त्याची आई दुपारी एक-दीडला घरी येऊन त्याला जेवायला वाढत असे, कधी कधी मी ही त्याच्याच कडे जेवत असे. पण त्या दिवशी काकूंना यायला काही कारणाने उशीर झाला आणि आमच्या पोटातले कावळे भुकेने व्याकूळ झालेले. आम्ही तोंडात टाकायला काही मिळतंय का बघायला त्याच्या स्वयंपाकघरात गेलो तर डब्यात अश्याच ३-४ शिळ्या पोळ्या दिसल्या.
झालं माझ्या अंगातला खवय्या जागा झाला आणि मी परश्याला फोडणीची पोळी बनवू म्हणून अक्षरशः भागच पाडलं. तो बिचारा नको नको म्हणत होता; कारण त्याने कधी त्या आधी खर्याच काय खेळण्यातल्या शेगडीवर सुद्धा काही बनवलं न्हवतं. तरी मी हट्टच केला म्हणून शेवटी आम्ही फोचीपो बनवली आणि खाऊन फस्त केली. थोड्या वेळाने काकू आल्या आणि त्यांना आम्ही केलेल्या पराक्रमाचा अंदाज आला. त्यांनी मला लगेच घरी पाठवलं आणि परश्याला थोडा ओरडा आणि थोडा मार खाऊ घातला! काकू मग आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईकडेही त्यांनी माझी तक्रार केली. त्यात त्यांचा एवढाच मुद्दा होता की आम्ही लहान होतो कुठे काही अपघात झाला असता तर काय? त्यांचं बरोबरच होतं; पण मला माझी मनपसंत फोचीपो खायला मिळालेली त्यामुळे मी खुश होतो!
तर वय वर्ष दहा ते आतापर्यंत मी किमान काही शे वेळा तरी फोडणीची पोळी खाल्ली असेल! त्यात बहुतेक वेळा ती माझी मलाच बनवून खायला आवडते. मस्त शेंगदाणे, तिखट मिरच्या, कांदा, कधीतरी वाटलं तर एखादा टोमाटो घालून किंवा थोडं लिंबू पिळून, वरून मस्त कोथिंबीर आणि साधी किंवा तिखट शेव भुरभुरवली तर काय लागते हो फोडणीची पोळी! आत्ता खरंतर मी खाऊनच लिहायला बसलोय पण हे लिहिताना माझ्या तोंडाला पुन्हा पाणी सुटलंय! कधी कधी आदल्या दिवशी मी आईला मुद्दाम पोळ्या जास्त बनवायला सांगतो; म्हणजे पुढच्या दिवशी हा बेत करता येतो!
आज फोडणीची पोळी बनवताना अचानक माझ्या मनात काही विचार आले. स्वयंपाक बनवताना नेहमी मला काहीतरी नवीन सुचतं, हे आजचे सगळे विचार आल्यावर मला जाणवलं. अर्थात आजचे विचार हे गेलेल्या वर्षाबद्दलचेच होते. मी गेले अनेक दिवस सोशल मीडियामध्ये किंवा कुणालाही भेटलो तरी ही एक गोष्ट ऐकत आलोय कि २०२० म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं सर्वात वाईट वर्ष होतं. काही बाबतीत हे खरंच आहे म्हणा! काहींचे सखे-सोयरे कोव्हीडने किंवा इतर कुठल्याही व्याधीने गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे धंदे बंद पडले किंवा बिझिनेसला जी गती मिळाली होती ती अचानक शून्यावर आली. त्यामुळे गेलेलं वर्ष वाईट होतं का? तर हो! ह्यात काहीच शंका नाही! पण ते सगळ्यात वाईट होतं का? तर माझ्या मते नाही. सांगतो का ते! ती गौतम बुद्धांची कथा आठवत्ये? ज्यात ते एका माणसाला ज्या घराला मृत्यूने स्पर्श केलेला नाही अश्या घरातून एक मुठ तांदूळ घेऊन यायला सांगतात? आणि त्या माणसाला असं एकही घर मिळत नाही? मागच्या वर्षाचही तसच आहे हो! त्या आधी तरी असं कुठलं वर्ष होतं जिथे सगळं चांगलंच घडलंय? आणि आपल्याला जे हवं तेच घडलं तरच चांगलं हा नियम कोणी आपणच बनवला ना? पण आपण अश्या इतक्या गोष्टी ठरवतो आणि त्या तश्याच झाल्या पाहिजेत म्हणून अट्टाहास करतो की आपण एक महत्वाचा मुद्दा विसरूनच जातो – Impermanence of life! आयुष्याची क्षणभंगुरता! २०२०ने ते फक्त ठळकपणे दाखवून दिलं इतकंच!
आता तुम्ही म्हणाल ह्यात फोडणीची पोळी कुठे आली? तर ती अशी. काल, म्हणजेच २०२० या वर्षात आपली जी स्वप्न मोडली, ज्या ठरवलेल्या गोष्टी अपूर्ण राहिल्या, जिथे जिथे म्हणून आपल्याला backfootवर यावं लागलं त्या सगळ्या गोष्टींना आज, म्हणजे नवीन वर्षात पुन्हा एक नवीन आशेची चटकदार फोडणी द्यावी. त्यात स्वप्नांचे शेंगदाणे घालावे, प्रयत्नाची जिरे-मोहरी तडतडू द्यावी. मेहेनातीचा कांदा घालावा; अश्रू येतील, ते येउ द्यावे. हे ही निघून जाणारेत हे लक्षात ठेवावं. मग नव्या उमेदीने मागच्या वर्षीची कुस्करलेली स्वप्न, इच्छा, आकांक्षांची शिळी पोळी घालून सर्व एकत्र करून घ्यावं आणि त्यावर थोडी नशिबाची कोथिंबीर आणि शेव भुरभूरवली की झाली फोडणीची पोळी तयार! त्याने ती अपुरी स्वप्न पूर्ण होणार का? नाही कदाचित. पण आयुष्यात थोडी चटक तरी टिकून राहील!
– अभिजीत जोग.

2 thoughts on “फोडणीची पोळी

  1. साध्या विषयाची चटकदार मांडणी करता करता त्याला बालपणीच्या आठवणीची फोडणी दिल्यामुळे *फोडणीची पोळी* डबल खुसखुशीत झाली आहे.

    Like

Leave a comment