हॅप्पी फ्रेंडशिप डे – भाग दूसरा

हॅप्पी फ्रेंडशिप डे – भाग दूसरा

ह्या कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा – हॅप्पी फ्रेंडशिप डे – भाग पहिला

इकडे उपवनला पोचून ईशानने बाइक चालवायला घेतली. श्रेयस मागे बसून त्याला योग्य ती मदत करत होता. काय स्पीडला कुठला गियर टाकायचा, स्पीड ब्रेकर आला की कोणत्या गियरला गाडी उचलायची त्याचं मार्गदर्शन करत होता. ईशान सुरुवातीला थोडा अडखळला. बाइकने तीन-चार वेळा सुरू व्हायला नकार दिला. श्रेयस शेवटी चिडून म्हणत होता की घरी जाऊन अभ्यास करू. पण पाच मिनिटात ईशानने आणि गाडीने पिकअप घेतला आणि ते वाऱ्याच्या वेगाने जाऊ लागले. श्रेयस भीती आणि काळजीपोटी मागून बडबडायला लागल्यावर ईशानने स्पीड कमी केला आणि आणखी एक राऊंड मारून घरी जाऊ अश्या बोलीवर तयार झाला.

उपवन रस्त्याच्या एका बाजूला तलावाचं मुख्य प्रवेशद्वार आणि गणपती मंदिर आहे तर दुसऱ्या टोकाला रस्ता पवार नगर, पोखरण रस्त्याकडे जातो तिथे वळणावर देवीचं मंदिर आहे. मंदीर थोडं चढणावर आहे आणि खाली कमान आहे. त्या कमानीजवळ एक कचऱ्याची पेटी आहे. मंदिराजवळ यू टर्न घेऊन ईशान उलटा येऊ लागला तशी तिथे कचरा पेटीपाशी बसलेली चार-पाच कुत्री अचानक भुंकायला लागली आणि त्यांच्या बाइकमागे जीव तोडून धावू लागली. यू टर्न घेतल्यामुळे आधीच स्पीड कमी झालेला; त्यामुळे ती कुत्री एकदम श्रेयसच्या पायाजवळ पोचली आणि त्याची पॅन्ट चावयचा प्रयत्न करू लागली. हे सगळं इतक्या झटपट घडलं की ईशानला काय करू काहीच कळेना. त्याने भीतीच्या दडपणाखाली बाइकचा स्पीड वाढवायला सुरुवात केली. मागून कुत्री भुंकतच होती त्यामुळे इतर सगळे आवाज त्याच्यासाठी नाहीसे झाले. काही सेकंदाने त्याला श्रेयसचा आवाज ऐकू आला तर श्रेयस ‘गाडी थांबव, गाडी थांबव’ असं ओरडत होता. ईशानला काही कळायच्या आतच त्याचे दोन्ही हात कामाला लागले आणि जे व्हायचं नव्हतं तेच होऊन गेलं.

दोन्ही ब्रेक एकाच वेळी लागल्याने गाडीने तोल सोडला आणि बाइकसकट ईशान आणि श्रेयस चांगले दहा-पंधरा फूट फरफटत खेचले गेले. एवढा आवाज झालेला पाहून ती कुत्री घाबरली आणि आलेल्या पावली निघून गेली. श्रेयसने उठून पाहिलं तर ईशानचा एक पाय बाइकखालीच अडकलेला. त्याने पटकन बाइक उचलून बाजूला केली आणि स्टँडला लावून ठेवली.

“तू ठीक आहेस का?” स्वतःच्या जखमा बघत बघत श्रेयसने विचारलं. त्याला नशिबाने फारसं लागलं नव्हतं.

“श्रेया मला डाव्या डोळ्याने काहीच दिसत नाहीये रे?!” ईशान उठत उठत म्हणाला आणि बाइकच्या आरशात स्वतःला पाहायला गेला. स्वतःचं प्रतिबिंब पाहून ईशानच्या पायाखालची जमीनच सरकली. चेहऱ्याचा डावा भाग पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. क्षणार्धात इतकं रक्त वाहिलं होतं की नक्की जखम कुठे झालीये हे कळायला काहीच मार्ग नव्हता.

“दिसत नाहीये म्हणजे?” श्रेयसला आतापर्यंत अंधारात ईशानचा चेहरा नीट दिसलाच नव्हता. त्याने जवळ जाऊन पाहिल्यावर त्याच्याही हृदयाचा ठोका चुकला.

“ए अरे माझा डोळा बिळा गेला..” वाक्य पूर्ण व्हायच्या आंतच त्याला भरून आलं.

“असं काही बोलू नको रे चु*या, थांब आपण हॉस्पिटलला जाऊ लगेच!” असं म्हणून श्रेयसने फोनसाठी हात खिशात घातला तर खिसा रिकामाच लागला. इतर खिसे चाचपून पाहिले तर फक्त सुट्टे पैसे मिळाले. त्याने आजूबाजूला पहिलं तर त्याचा फोन जवळच पडलेला दिसला. तो उचलून पाहिला तर स्क्रीनचा पूर्ण चुरा झालेला आणि फोन बंद पडलेला होता.

“ईशान तुझ्या फोनवरून विक्रमला फोन लाव. त्यांना म्हणो लवकर इकडे या.”

ईशानचा फोन नशिबाने खिशातच आणि सुस्थितीत होता. त्याने विक्रमला फोन केला, झालेला प्रकार थोडक्यात सांगितला आणि लवकरात लवकर यायला सांगितलं.

इकडे ‘अजंता बार अँड रेस्टोरंट’ मध्ये नुकताच पेग भरून पार्टीला सुरुवात झालेली. ईशानच्या फोनने एका क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला. फोन ठेवून ऋग्वेद आणि आशुतोषला बातमी द्यायच्या आधीच विक्रमने वेटरला बिल आणायची खूण केली, भरलेला पेग तोंडाला लावला आणि रिकामा करूनच खाली ठेवला.

“अरे अरे झालं काय? एकदम एवढा जोश?!” ऋग्वेदने विचारलं.

“ईशान आणि श्रेयसचा अॅक्सिडेंट झालाय.” विक्रम उत्तरला.

“व्हॉट द फक? कुठे?” आशुतोषने आश्चर्याने विचारलं. बातमी ऐकून ऋग्वेद जागीच स्तब्ध झाला.

“तिथेच उपवनला, डिटेल्स नंतर बघू आधी इकडून निघू. ए बिल ला ना जलदी!” विक्रमने उत्तर दिलं आणि बिलसाठी आवाज दिला. बातमी इतकी धक्कादायक होती की ऋग्वेद आणि आशुतोषने त्यांचे ग्लास तसेच सोडले आणि दुसऱ्या मिनीटाला ते तिघं बिल भरून बाहेर पडले.

उपवनजवळ पोचले तेव्हा श्रेयस आणि ईशान जवळच्याच बसस्टॉपवर त्यांची वाट बघत बसले होते. बाइक तिथेच बाजूला लावलेली; बाइकचा डावा आरसा निखळून लटकत होता. पेट्रोलच्या टाकीला डाव्या बाजूला पूर्ण चरे गेलेले. श्रेयस तसा ठीक दिसत होता; पण ईशानचा चेहरा मात्र चांगलाच सुजला होता. त्याच्या डाव्या मांडीलाही बरंच लागलं होतं, पण चेहऱ्याची जखम जास्त गंभीर होती.

ऋग्वेदने हॉटेल मधून निघताना पाण्याची बाटली घेतली होती ती पुढे करत पहिला प्रश्न केला, “काय रे कसं झालं हे?”

श्रेयसने बाटली उघडून ईशानकडे देत उत्तर दिलं, “काही नाही अरे कुत्रे लागले मागे, आणि बॅलेन्स गेला बाइकचा.”

“एवढं लागलंय तर हॉस्पिटलला न्यायचं ना ह्याला!” विक्रम म्हणाला.

“आम्ही तुम्हाला कॉल केल्यावर तेच ट्राय करत होतो. पण आशुची बाइक चालूच होत नाहीये.” श्रेयस म्हणाला.

“चल जाऊ लगेच, इकडे बाजूलाच आहे एक हॉस्पिटल!” विक्रम बाइकवर बसत म्हणाला. आशुतोषची बाइक त्यांनी तिथेच ठेवली आणि तडक हॉस्पिटल गाठलं. ईशान आणि श्रेयसवर आपात्कालीन कक्षात प्रार्थमिक उपचार झाले. श्रेयसला गुडघ्याला थोडंच खरचटलं होतं. त्याला मलमपट्टी करून लगेच सोडलं. ईशानची जखम मात्र गंभीर होती. डोळा थोडक्यात वाचला होता. भुवई आणि पापणीचा थोडा भाग गेला होता. डोळ्याला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि आत काही कचरा गेला नाही ना याची खात्री करायला ऑपरेशन करावं लागणार होतं. त्यामुळे घरच्यांच्या परवानगीशिवाय पुढचे उपचार होणार नाहीत असं सांगण्यात आलं. आता खरा पेच निर्माण झाला होता. ईशान मूळचा दापोलीचा; शिकायला म्हणून मुंबईत आलेला आणि कॉलेजजवळच पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. त्याची एक लांबची मावशी गिरगावात स्थायिक होती, पण एवढ्या रात्री त्यांना तरी कसं बोलवणार! शेवटी नाईलाजाने श्रेयसने त्याच्या बाबांना फोन केला.

“हॅलो बाबा, ऐका ना, लगेच उपवन हॉस्पिटलला निघून या!” बाबांनी फोन उचलताच श्रेयस म्हणाला.

“हॉस्पिटल? काय रे काय झालं?” डॉ. प्रभू गोंधळून म्हणाले.

“मी आणि ईशान बाइकवरून पडलोय! मला जास्त काही लागलं नाहीये पण ईशानचं एक छोटं ऑपरेशन करावं लागणारे. तुम्ही या ना मग मी एक्सप्लेन करतो!” श्रेयसचा धीर सुटत होता.

“ओह गॉड! बर बर ठिके! मी एक पंधरा मिनीटात येतो तिथे, डोन्ट वरी!” एवढं बोलून डॉ. प्रभूंनी फोन ठेवला आणि निघायच्या तयारीला लागले.

“आता ईशानच्या बाबांना पण फोन करून सांगून टाक. आत्ता तुझ्या बाबांनी हॅंडल केलं तरी नंतर त्यांना यावच लागेल.” श्रेयसने फोन ठेवताच ऋग्वेद म्हणाला. ते सगळे हॉस्पिटलच्या गेटपाशी उभे होते.

“ए चल त्यांचाशी मी नाही बोलणार! मला नाही जमणार! तुला करायचा तर कर फोन तू.” ईशानचा फोन श्रेयस कडेच होता. तो पुढे करत श्रेयस म्हणाला.

“सोड ना! बेटर श्रेयसच्या बाबांनाच बोलू दे. म्हणजे कसं जोशीकाकांना पण इकडे कोणीतरी जबाबदार आहे ते कळेल. उगाच टेंशन नाही घेणार ते!” चहाचा घोट घेत विक्रमने सुचवलं.

“हा बेस्ट! लेट अंकल कम!” आशुतोषने म्हटलं.

दहा मिनीटात श्रेयसचे आई-बाबा आले. श्रेयसला पाहताच मिसेस प्रभू म्हणाल्या, “हे काय रे गोंधळ घालून ठेवलात!”

“अगं काही नाही, मी ईशानला बाइक चालवायला शिकवत होतो आणि कुत्री मागे लागली इकडे उपवनपाशी, ती त्या कचरापेटी पाशी असतात ना ती! त्यामुळे बाइक स्लिप झाली आणि पडलो आम्ही. मी ठीक आहे पण! बाबा चला ना आत ईशानला बरंच लागलंय. डॉक्टर म्हणतायत त्याचे आई-बाबा असल्याशिवाय ऑपरेशन नाही होणार!” श्रेयसने गडबडीने झालेला प्रकार कथित केला आणि त्यांना ओढतच आत नेलं.

पुढच्या एका तासात डॉ. प्रभूंनी हॉस्पिटलच्या रात्रपाळीत काम करणाऱ्या डॉक्टरशी सल्ला-मसलत केली. डॉ. प्रभू स्वतः एक प्रथितयश न्यूरोसर्जन होते; त्यामुळे हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर त्यांना किमान नावाने तरी ओळखतच होते. फायनली ऑपरेशन दुसऱ्या दिवशी दुपारी चारला करायचं ठरलं. मग श्रेयसने ईशानच्याच फोनवरून मिस्टर जोशींना फोन लावला आणि डॉ प्रभूंनी झालेला प्रकार त्यांना सांगितला. काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही पण ईशानला सोबत म्हणून त्यांनी यावं असंही डॉ. प्रभूंनी सांगितलं. मिस्टर जोशी सुरुवातीला थोडे घाबरले, पण श्रेयसच्या बाबांनी समजावल्यावर शांत झाले. ऑपरेशन दुपारी असल्यामुळे घाई-गडबड करून न निघता सकाळची पहिली एक्सप्रेस पकडून ते येऊ शकतील असं डॉ. प्रभूंनी सुचवलं आणि त्यांनाही ते पटलं. त्यामुळे ते दुपारी बारा पर्यंत येतील असं निश्चित झालं. इतकं सगळं होईपर्यंत रात्रीचे अडीच वाजले होते.

ऑपरेशन होणार आणि ईशानचे आई-बाबा येणार हे पक्क झाल्यावर शेवटी मुलांचा जीव भांड्यात पडला. पण लगेच उद्याच्या परीक्षेचा विचार येऊन पुन्हा टेंशन आलं. ह्या सगळ्या प्रकारात त्यांचे काही तास असेच वाया गेले होते. आता अभ्यास करणार कधी, झोपणार कधी आणि काय? ईशानला पेनकीलरमुळे कधीच झोप लागली होती. तरी कोणीतरी तिथे सोबत थांबणं गरजेच आहे असं सगळ्यांना वाटत होतं. आणि खरंतर त्याला एकटं सोडून घरी जायला कोणीच तयार नव्हतं. पण इच्छा नसली तरी उद्याची परीक्षा द्यावी लागणार होती. शेवटी नाईलाजाने कशीबशी मुलं घरी जायला तयार झाली. ईशानला काही लागलं तर त्याची सोय हॉस्पिटल स्टाफ करेल याची खात्री करून डॉ. आणि मिसेस प्रभूही निघाले. त्यांचा निरोप घेऊन मुलंही हॉस्पिटलमधून विक्रमच्या घरी आली आणि अभ्यासाला बसली. पण काही केल्या कोणाचंच लक्ष लागत नव्हतं. श्रेयसला तर सारखा ईशानचा चेहरा डोळ्यासमोर येऊन अस्वस्थ वाटत होतं. कशीबशी मुलांनी काही पानं वाचली आणि थोडीशी झोप काढली.

सकाळी साडेसात वाजता सगळे पुन्हा हॉस्पिटलला आले. ईशानला रात्री जनरल वॉर्ड मधून स्पेशल वॉर्ड मध्ये हलवलं होतं; स्वतंत्र खोली, चोवीस तास मदतीला एक माणूस, समोर भिंतीवर टीव्ही, एसी अश्या सगळ्या सुविधांनी परिपूर्ण अशी ती स्पेशल वॉर्डची खोली होती. त्यामुळे ही मंडळी भेटायला आली तेव्हा ईशान उठून टीव्ही बघत बसला होता. त्या सगळ्यांना पाहून एकदम त्याचा चेहरा खुलला.

“हाय गायस्!” ईशान टीव्ही बंद करत म्हणाला.

“कैसा ही भाई?! ऑल गुड?” आशुतोषने विचारलं.

“येस, ऑल गुड! फाइव स्टार हॉटेल आहे हे हॉस्पिटल म्हणजे! पेरमनेन्टली पण राहू शकतो इकडे!”

“चु*या, काही पण काय बोलतो रे! देऊ का एक!” विक्रमने त्याच्या पायावर अलगद मारत म्हणलं.

“अरे म्हणजे एवढं भारी आहे!” ईशानने स्पष्ट केलं.

“आईचा फोन आलेला का? ते निघणार होते सकाळी.” श्रेयसने विचारलं.

“हो आलेला मगाशीच, येतील बारा पर्यंत! थॅंक्स यार श्रेया! काल काकांमुळे सॉर्ट झालं सगळं!”

“थॅंक्स काय रे! एवढे मोठे डॉक्टर झाले आणि त्यांच्या मुलाच्या कामी नाही आले तर काय उपयोग!” श्रेयसने ईशानच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.

पण ईशान वेगळ्याच ट्रॅक वर होता. “नो सिरियसली यार! माझ्यामुळे काल अभ्यास सुरू करायला पण लेट झालं आपल्याला, परत रात्री एवढा वेळ वाया गेला! रीयालि सॉरी गायस्!”

“अरे काय लावलंय हे सॉरी आणि थॅंक यू! काल पडलास तेव्हा स्क्रू-बी ढीला झाला की काय ?” ऋग्वेद हसत हसत बोलला. त्याच्या या वाक्यावर बाकीचेही हसले.

“तसं नाही यार! पण आज काय उखडणार तुम्ही पेपर मध्ये?”

“ते आम्ही बघून घेऊ! तू चिल कर!” विक्रम म्हणाला.

“हा वैसे भी ये तो फर्स्ट अटेम्प्ट है! अजून दोन चान्स आहेत आपल्याकडे!” आशुतोषच्या या वाक्यावर सगळे पुन्हा हसले. तेवढ्यात ईशानसाठी नाश्ता आला. एका मोठ्या ट्रे मध्ये इडली-चटणी आणि सांबार, एक फ्रूटप्लेट, ज्यूसचं एक छोटं टेट्रापॅक, गरम पाण्याचा एक छोटा थरमस आणि चहा-कॉफीचे रेडी-टु-मेक पॅकेट असं सगळं त्याच्या समोर ठेवण्यात आलं. ईशानने फक्त इडली सांबार खाणार असं सांगितल्यावर बाकीच्या गोष्टी संपवायचं काम इतरांनी केलं. सगळा ट्रे रिकामा झाल्यावर ईशानचा निरोप घेऊन मुलं बाहेर पडली. ईशानही गोळ्या घेऊन पुन्हा आडवा झाला.

दुपारी त्याचे आई-बाबा आले तेव्हा त्यांना भेटायला श्रेयसचे बाबाही गेले होते. डॉ. प्रभूंनी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरचीही भेट घेतली आणि ऑपरेशनचा आढावा घेतला. ही सगळी मुलं पेपर देऊन अडीच वाजता पुन्हा हॉस्पिटलला पोहोचली. चार वाजता ऑपरेशन सुरू झालं तेव्हा ईशानच्या आई-बाबांसोबत ही मुलंही तिथेच होती. डोळ्याच्या इतक्या जवळ जखम असल्यामुळे अंशतः गुंगी न देता पूर्ण भूल द्यावी लागली होती; त्यामुळे ईशानला थेट दुसऱ्या दिवशी पूर्ण शुद्ध येणार होती. सुमारे दोन-अडीच तासात ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं आणि मग मुलं मिस्टर आणि मिसेस जोशींचा निरोप घेऊन विक्रमच्या घरी परतली. वाटेत त्यांनी आदल्या रात्री तशीच सोडलेली आशुतोषची बाइकही ताब्यात घेतली आणि जवळच्याच गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी जमा केली.

दुसऱ्या दिवशी ईशानला लगेच डिस्चार्ज देण्यात आला. पण पापणी आणि भुवई गेलेली ती जागा प्लॅस्टिक सर्जरी करून कृत्रिमरित्या भरली असल्यामुळे ते बरं व्हायला काही दिवस लागणार होते. त्या ओल्या जखमेला काही होऊ नये म्हणून ते समुद्री पायरेट घालतात तसा मास्क ईशानला दिला होता आणि काही दिवस बेडरेस्टचा सल्ला दिला होता. त्यामुळे पूर्ण सेमेस्टर परीक्षेवर ईशानला पाणी सोडावं लागणार होतं. ईशानच्या बाबांनी मग कॉलेजच्या प्रिन्सीपलची भेट घेऊन ईशानसोबत झालेला प्रकार त्यांना सांगितला आणि त्याला परीक्षेतून सूट मिळावी असा लेखी अर्ज केला. जेव्हा सेमेस्टरचा रिजल्ट आला तेव्हा ईशानला सगळ्या पेपरमध्ये ग्रेस मार्क्स देऊन पास करण्यात आलं होतं. बाकी चौघे मात्र के. टी. घेऊन बसले होते. पण त्याबद्दल कोणाच्याही मनात दुःख किंवा तक्रारीचा लवलेशही नव्हता.

कारण आयुष्यात त्यांनी जेव्हा जेव्हा त्या सेमेस्टरची मार्कशीट हातात घेतली, तेव्हा त्यांना परीक्षेच्या आधीची ती रात्र आठवली. आणि त्यावेळी भयावह वाटत असल्या तरी काळाच्या ओघात त्या आठवणीही मजेशीर वाटू लागल्या होत्या. ईशानचं आणि आशुतोषचं ते रात्री-अपरात्री गेम खेळणं, लेट आल्यामुळे विक्रमने चिडून दिलेल्या शिव्या, अभ्यास करायचं सोडून त्यांचं ते पिझ्झा, कॉफी आणि सिगरेट यातच वेळ घालवणं, ईशानला बाइक सुरू करता येत नव्हती म्हणून श्रेयसचं त्याच्यावर चिडणं, विक्रमचं परीक्षेच्या आदल्या दिवशी दारू पिण्याचं भलतंच खूळ, ईशानसाठी ब्रेकफास्ट ट्रेमध्ये आलेल्या फ्रूटप्लेट मधली शेवटची फोड खाताना झालेली त्यांची झटापट, पहिला पेपर लिहिताना पूर्ण ब्लॅंक असल्यामुळे परीक्षा हॉलमध्ये बसून त्यांचं ते नुसतं एकमेकांकडे बघून हसणं, ऑपरेशन नंतर ईशानला डोळा जपता यावा म्हणून जे पायरेट मास्क दिलेलं त्यावरून बाकीच्यांनी त्याला चिडवणं, या अश्या आणि इतर असंख्य आठवणी त्या मुलांनी पुढे अनेकदा काढल्या आणि अगणित मैफिली रंगावल्या. कारण ईशानच्या जखमांच्या खूणेसोबत त्या रात्रीच्या वाईट आठवणीही पुसल्या गेल्या होत्या.

समाप्त

One thought on “हॅप्पी फ्रेंडशिप डे – भाग दूसरा

Leave a comment