श्रेयसने आणखी एक सिगरेट पेटवत ईशानला फोन केला आणि विक्रमला चहाची ऑर्डर द्यायची खूण केली. विक्रमने शिट्टीनेच चहावाल्याचं लक्ष वेधलं आणि दोन चहाची ऑर्डर दिली. गेले दोन तास ते दोघं ईशानची वाट बघत होते. उद्यापासून परीक्षा सुरू होणार होती तरी ह्या मुलांकडे अभ्यासाच्या नोट्स नव्हत्या! ईशान त्याचीच तरतूद करायला भायखळयाला त्यांच्या क्लास रिप्रेसेंटेटीवच्या घरी गेला होता. नोट्स कलेक्ट करून बारा वाजता ठाणे स्टेशनला भेटायचं ठरलं होतं पण आता दोन वाजून गेले तरी ईशानचा पत्ता नव्हता. आत्तापर्यंत श्रेयस आणि विक्रमने पन्नासवेळा तरी फोन केला होता! ते दोघं धड जेवलेही नव्हते. नुसतंच बसून सिगरेटी आणि चहाचा रतिब चालू होता.
त्यांनी केलेल्या प्लॅन प्रमाणे एव्हाना ते विक्रमच्या दुसऱ्या घरी असायला हवे होते. तिकडे त्यांचे आणखी दोन मित्र त्यांना भेटणार होते. आशुतोष आणि ऋग्वेद ह्या तिघांचे ज्युनिअर असूनही त्यांची इतकी घट्ट मैत्री जमली होती की ह्या पाच मित्रांचा ग्रूप अख्ख्या कॉलेजला माहीत होता! त्यांचे एक शिक्षक तर त्यांना पांडवच म्हणायचे! ग्रुपचा म्होरक्या युधिष्ठिर म्हणजे श्रेयस! ग्रुपने कुठे जायचं, काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं ह्या सगळ्या गोष्टींचे निर्णय श्रेयसच्या हातात असत. त्यांनी असं काही ठरवलं नव्हतं, ते आपोआप होत गेलं. विक्रम म्हणजे भीम! हल्लीच्या भाषेत सांगायचं तर जिम वेडा! दैवी देणगीसारखा मिळालेला साडेसहा फुटाचा देह त्याने जिममध्ये जावून चांगला पिळदार केलेला! सोबत अभ्यासही तितकाच ताकदीचा! ग्रुपचे बाकी चौघे गटांगळ्या खात पास व्हायचे; पण विक्रम मात्र वर्गातल्या टॉपरस् पैकी एक. ईशान म्हणजे अर्जुन! दिसायला कॉलेजच्या भाषेत म्हणायचं तर ‘छावा’! कॉलेजच्या पहिल्याच सेमेस्टरमध्ये त्याची क्रिकेट टीममध्ये निवड झाली होती. आणि दुसरं वर्ष संपेपर्यंत तो टीमचा कॅप्टनही झाला होता! आशुतोष आणि ऋग्वेद जुळे नसले तरी नकुल-सहदेव सारखेच! इयत्ता पहिलीत भेटले ते आजतागायत प्रत्येक गोष्टीत एकत्र! आश्चर्य म्हणजे बारावीत सीईटी मध्येसुद्धा दोघांना तेवढेच मार्क्स मिळाले होते! पण म्हणूनच त्यांच्या जोडीला ‘जय-वीरू’ असं देखील म्हणत. तर अशी ही पाच पांडवांची वज्रमूठ दुसऱ्या वर्षापासून घट्ट झाली ती कायमचीच.
आता सीनिअर तिघे सातव्या सेमेस्टरला होते आणि ज्युनिअर पाचव्या. त्यामुळे उद्यापासून सुरू होणारी परीक्षा खरंतर सीनियर तिघांसाठी खूप महत्त्वाची होती. नेहमी त्या तिघांचा अभ्यासाचा आणि नोट्सचा प्रश्न विक्रम सोडवत असे. तो स्वतः नोट्स काढत असे आणि इतर दोघांना शिकवत असे. पण अलीकडे विक्रमचं अभ्यासातलं लक्ष काहीसं विचलित झालं होतं. नुकतच प्रेम प्रकरण फिस्कटल्यामुळे तो थोडा डिस्टर्ब होता. इतक्या वर्षात बाकीच्यांना आहारी जाताना पाहूनही सिगरेटच्या मोहात न पडलेला विक्रम गेल्या चार महिन्यांपासून अगदी यथेच्छ ओढायला लागलेला. खरी ग्रुपला ही सवय श्रेयसने लावली होती! पण आज श्रेयसपेक्षा विक्रमच जास्त सिगरेट ओढत होता. गेल्या दोन तासात त्यांनी दोन पाकिटे उडवली होती.
विक्रमने चहाचा एक झुरका मारत नवीन सिगरेट पेटवली आणि न राहवून म्हणाला, “भें*द बास झालं आता! हा काय चु*या बनवतोय का आपल्याला!?” त्याने रागातच काडी हवेत उडवली आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने पाहू लागला.
एरवी शांत असणारा श्रेयसही खरं थोडा चिडला होता. पण विक्रमच्या वाक्यावर तो काही बोलला नाही. आणि आता त्याला राग कमी आणि थोडी चिंताच जास्त वाटायला लागली होती. काय झालं असेल की ईशान येतही नाही आणि फोनही उचलत नाही? कुठे काही बरं वाईट तर झालं नसेल ना? असा विचार करत असतानाच त्याला ईशान समोरून येताना दिसला!
ईशानला पाहताच विक्रम डाफरला, “काय रे तिथे काय पूजा सांगत बसलेला का सत्यनारायणाची?”
“बॅगचं वजन बघ किती झालंय आणि मग बोल कळलं?” पाठीवरची बॅग विक्रमसमोर टाकत ईशान म्हणला. त्याला पाहताच चहावाल्याने एक स्पेशल कटिंग चहा काऊंटरवर ठेवला. गेली साडेतीन वर्ष ही मुलं दररोज ट्रेन पकडण्यापूर्वी आणि परत आल्यावर किमान अर्धा-एक तास तरी त्या टपरीवर घालवत होती. टपरी एखाद दिवस बंद असली तरी ही मुलं तिथे बाकड्यावर बसून गप्पा मारत बसत. त्यामुळे कोणाला कोणती सिगरेट लागते, चहात आलं, वेलची कोणाला चालतं किंवा चालत नाही, हे त्या चहावाल्याला बरोबर माहीत होतं.
“अरे अडीच वाजले दादा! आता काय घंटा अभ्यास करणार? अजुन जेवलो पण नाही आम्ही!” श्रेयसने त्याचा संताप व्यक्त केला.
“मग मी काय ‘थ्री कोर्स मील’ जेवून आलोय? एका वडपाववर आहे सकाळपासून. त्या नोट्स सॉर्ट करण्यातच किती वेळ गेला भेंडी! राधिका पण शिव्या घालत होती.” चहाचा घोट घेत ईशान म्हणाला.
“पण फोन उचलून सांगायचं तरी कुठे घालतोयस ते! आम्हाला टेन्शन ना कुठे धडपडलास की काय म्हणून! बरं फोन उचलत नाही ठीक आहे, निदान तिथून निघाल्यावर एक मेसेज करून सांगायचं तरी!” विक्रम पुन्हा ओरडला.
“अरे फोन बॅगमध्ये होता आणि सायलेंटवर असतो नेहमी. सॉरी मेसेज करायचं लक्षात नाही आलं गडबडीत! सॉरी! सोड ना, महत्वाचं काये, नोट्स आल्या आहेत फायनली, आता बोला काय करायचं!” विक्रमच्या हातातून सिगरेट घेत ईशान म्हणाला.
“आता काय आधी पोटा-पाण्याचं बघू काहीतरी! जाम भूक लागलीये! अडीच तास नुसतं चहा आणि सिगरेट एवढंच चाललंय.” मोबईलमध्ये वेळ बघत श्रेयस म्हणाला.
“हो यार, तुझ्यामुळे साल्या! एकदा सांगितलं असतंस तर बारा वाजल्यापासून इकडे आलोच नसतो ना! घरी मस्त सुरमई फ्राय बनवणार होती आई, ते सोडून आलोय इथे झक मारायला कधीचे.” विक्रम चांगलाच वैतागला होता.
“एऽऽ बास की आता, जीव घेतो का पोराचा!? ए श्रेया ह्याला गप कर!”
“त्याला भूक लागल्ये बाकी काही नाही! चला इथून हलुया आधी! संतोष चहा-सिगरेटचे किती झाले?” श्रेयसने चाहावाल्याला विचारलं.
“आधीचे बाकी पकडून टोटल ₹७८८ झाले दादा!” चहावाला म्हणाला.
“अरे लुटतो का काय संत्या आम्हाला? बघू वही दाखव!” उधारी ऐकून विक्रमला धक्काच बसला.
“तुम्ही इथे पडलेले असता तासंतास फुकटचे, त्याला मी काय करणार! बघ सगळं लिहिलंय” चहावाला शांतपणे वही पुढे करत उत्तरला. साडेतीन वर्षात तो त्यांचा मित्रच झाला होता, त्यामुळे त्यांच्यात अश्या शाब्दिक चकमकी होत असत.
“संतोष बंगला बांधलास की बोलव काय वास्तूशांतीला!” श्रेयस उपहासाने म्हणाला.
“अरे तू पैसे तर काढ, लगेच बांधतो बंगला!” संतोष हसत हसत बोलला. श्रेयसने निमूटपणे पाचशेची नोट काढून काऊंटरवर ठेवली. विक्रमने देखील वरचे पैसे दिले आणि मुलं पार्किंग लॉटच्या दिशेने चालू लागली.
“श्रेया मी चालवू बाइक आत्ता?” ईशानने सहजच विचारलं. श्रेयसनेच त्याला काही दिवसांपूर्वी बाइक चालवायला शिकवली होती.
“आत्ता ट्रॅफिक असतो रे. आपण रात्री एक चक्कर मारू! तेव्हा चालव!” श्रेयसने उत्तर दिलं. चालता चालता त्यांचं असं ठरलं की कुठेतरी जाऊन आणखी वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी पिझ्झा ऑर्डर करावा. निघायच्या आधी आशुतोष आणि ऋग्वेदला कॉल करून थेट फ्लॅटवरच भेटा असा निरोप गेला. ईशानने बाइकवर बसल्या बसल्या पिझ्झाची ऑर्डर दिली आणि उदरभरणाच्या प्रश्नाचा निकाल लावला.
आता मुख्य प्रश्न होता तो पुढच्या अठरा तासात उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा. पण मुलं तीन वर्ष परीक्षा देऊन तयार झालेली होती. येणारी परीक्षा शेवटची लेखी परीक्षा होती, त्यात दोन पेपर मध्ये एक-दोन दिवस सुट्टी असल्याने सगळे बिनधास्त होते. परीक्षेचे सगळे दिवस ते विक्रमच्या फ्लॅटवरच राहणार होते. नियमच होता त्यांचा. आत्तापर्यंत के. टी. आणि साध्या अश्या मिळून जितक्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या ह्या मुलांनी एकत्र अभ्यास करूनच दिल्या होत्या. वास्तविक विक्रमला स्वतःला एकदाही के. टी. लागली नव्हती. तरी तो ह्यांच्या सोबत के. टी. परीक्षेदरम्यान राहत असे; त्यांच्या शंका सोडवत असे, त्यांच्यासाठी मॅगी, चहा, कॉफी, इतर काही सोपे पदार्थ बनवत असे. जेवण ऑर्डर करणे, सिगरेटी घेऊन येणे अशी कामं करून यजमानाची भूमिका निभावत असे. प्रत्येक परीक्षा झाल्यावर त्याच्याच फ्लॅटवर जय्यत पार्टी तर हमखास ठरलेली.
विक्रमच्या बिल्डिंगपाशी ते तिघं पोचले तर आशुतोष आणि ऋग्वेद येऊन गेटपाशी थांबले होते. विक्रमने आशुतोषच्या हातात सिगरेट पहिली आणि डोळे मोठे करून हळू आवाजात म्हणाला, “गुडघ्यात मेंदू आहे का रे तुझ्या? गेटसमोर काय फुकतोय. टाक खाली!”
“अरे घरात फुकतो मग खाली काय त्रास आहे?” आशुतोषने सिगरेट खाली फेकत विचारलं.
“अरे घरात चालतं. इथे कोणी पाहिलं आणि बापाला सांगितलं ना माझ्या तर गेम ओवर होईल आपला!” विक्रम गेटमधून आत शिरत म्हणाला.
“काकांसमोर एवढी का रे फाटते तुझी?” ऋग्वेदने टर उडवत विचारलं.
“तू येऊन रहा एक आठवडा माझ्या घरी मग कळेल.”
मुलांनी वर जाऊन घराची साफसफाई सुरू केली. विक्रमचं घर म्हणजे चांगला चार खोल्यांचा फ्लॅट होता. जुनं बांधकाम असल्यामुळे खोल्याही प्रशस्त होत्या. हॉलला लागून मोठी बाल्कनी होती. ह्याच बाल्कनीत त्यांची पार्टी होत असे. बाल्कनीत खंडीभर कुंड्या होत्या पण त्यातली झाडं आणि माती वाळून गेलेलं होतं. मुलं साफसफाई करण्यात मग्न असतानाच पिझ्झाची डिलिव्हरी आली. पुढचा पाऊण-एक तास खादाडीत गेला आणि खुद्द ज्याच्यासाठी ते जमले होते ते सुरू करायला चार वाजले. सिनियर मंडळी एका बेडरूममध्ये आणि ज्युनिअर दुसरीकडे अशी विभागणी झाली आणि एकदाची अभ्यासाला सुरुवात झाली.
पण एका जागी फार काळ बुड टिकणं कठीण होतं. आधीच सकाळपासून निष्कारण रखरख झालेली, त्यात पिझ्झा आणि कोकाकोला असा पौष्टिक आहार घेतलेला. त्यामुळे तासाभरातच सगळे पेंगायला लागले. मग झोप घालवायला कॉफी झाली, जोडीला एक एक सिगरेट पेटवली गेली आणि सगळे पुन्हा हॉल मध्ये येऊन बसले.
“काय होणारे यार उद्या आपलं? एक चॅप्टर पण नाही झाला अजुन!” ईशान चिंतेच्या सुरात म्हणाला.
“हा अजुन यायचं ना चार तास उशिरा! मग झाला असता पटापट अभ्यास!” विक्रम कॉफीचा घोट घेत म्हणाला.
“अजुन किती वेळा सॉरी म्हणलो की मुस्काट बंद होईल तुझं? कधीचा डोक्याला शॉट!” ईशान आता खरंच चिडला.
“सॉरी बिरी जाऊदे! खरं सांग एवढा उशीर का झाला तुला आज? उठला नसशील ना सकाळी वेळेवर?!” ऋग्वेदने बरोबर दुखत्या नसेवर हात घातला.
“हा! सही पकडे हैं बॉस! काय रे जोश्या खरं सांग!? काल गेम खेळत बसला असशील रात्री?” विक्रमने ऋग्वेदचा पॉइंट उचलून धरला.
“काल आम्हीच तर खेळत होतो ऑनलाईन! आपण किती एक वाजता बंद केला ना गेम?” आशुतोषने शेवटी गोप्यस्फोट केला.
“चायला जोश्या तुझ्या गेमच्या नादात उद्या गेम होतोय आपला!” श्रेयस म्हणाला.
ईशानला आता चूक मान्य करण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. त्याने मान खाली घालून कॉफी आणि सिगरेटवर लक्ष दिलं.
“बोल ना आता का तोंड शिवलं तुझं? मला मगाशी शिव्या घालत होता भेंडी, आता उत्तर दे!?” विक्रमने पुन्हा डिवचलं.
“ओके, ओके! आय एम रिअली सॉरी! पण आशुच हात धुवून मागे लागलेला एक गेम खेळू एक गेम खेळू! मग झाला उशीर झोपायला!” ईशान अखेर बोलता झाला.
सगळ्यांनी लगेच मोर्चा आशूकडे वळवला. त्याचं नाव येताच त्याने कॉफीचा कप तोंडाला लावला आणि त्या आडून मिस्कीलपणे हसायला लागला.
“आशु? अरे काय येडा आहेस का तू? उद्या परीक्षा आणि गेम कसला खेळतो!? जरा अभ्यास केलास तर पहिल्या अटेम्टला पास तरी होशील रे!” श्रेयसने पहिला वार केला.
“मग तू कशाला बसलाय इकडे टाईमपास करत? चल आत जाऊन अभ्यासाला लाग!” आशुतोषने प्रत्युत्तर दिलं.
“चला खरंच पटापट आटपू आणि बसुया यार अभ्यासाला! परत रात्री जेवणात वेळ जाईल!” ऋग्वेद सिगरेट विझवत म्हणाला.
“ए चिल, उद्या पेपर दहा वाजता आहे. सो सकाळी लेटेस्ट नऊची ट्रेन घेऊ शकतो आपण! म्हणजे इकडून पावणे नऊला निघालो तरी चालेल!” आशुतोषने अंदाज बांधला.
“अरे? ऐसा कैसे चलेगा बॉस? परीक्षेला जायचं तेही सकाळी संतोषबुवांचं दर्शन आणि तीर्थ-प्रसाद न घेता?” विक्रम गमतीत बोलला.
“आधी आजचं बघा! उद्याचे प्लॅन करतायत! चला सगळे अभ्यासाला बसू!” श्रेयस अखेर जागचा उठला. त्याचं ऐकून बाकीचेही उठले आणि आपापल्या जागी जाऊन बसले. पुढचे तीन-चार तास घरात पूर्ण शांतता पसरली. मुलांनी अभ्यास करायचं मनावर घेतलं होतं. सिगरेटची तलब लागलीच तर एक एक जण बाल्कनीत जाऊन येत होता. बाकी कसलाच व्यत्यय नव्हता. घरात फक्त फॅनच्या वाऱ्याचा अखंड आवाज येत होता. त्या आवाजाचा एक वेगळाच ट्रान्स निर्माण झालेला. मधूनच खिडकीत एखादा पक्षी येऊन चिवचिवून जात होता आणि तो ट्रान्स मोडत होता. घर पहिल्याच मजल्यावर असल्यामुळे खालून जाणाऱ्या फेरीवाल्यांचा, बाइकचा, रिक्षांचा आणि कुत्र्यांचा अधून मधून आवाज येत होता. जशी जशी संध्याकाळ होत गेली तसतसा एकेका घरातून कूकरच्या शिट्यांचा आवाज यायला लागला. रविवार असल्यामुळे काही घरांमध्ये मांसाहार बनवला जात असावा. त्या सगळ्या मसाल्यांचे जसजसे वास येऊ लागले तशी मुलांची चलबिचल सुरू झाली. दुपारचा पिझ्झा कुठच्या कुठे जिरला होता. शेवटी नऊ वाजता मुलांनी अभ्यास बाजूला ठेवला आणि जेवणासाठी खाली उतरायचं ठरवलं.
“पोरांनो कोणाला काय खायचंय बोला?” श्रेयसने विचारलं.
“मस्त चायनीज खाऊया का? चिकन मांचुरियन खावसं वाटतंय!” ईशानने त्याची इच्छा दर्शवली.
“हा! ट्रीपल फ्राईड राईस चालेल मला!” ऋग्वेदने ईशानला दुजोरा देत म्हटलं.
“माझा दुपारचा पिझ्झा अजुन जिरला नाहीये पूर्ण! मी हलकं खातो काहीतरी!” श्रेयस म्हणाला.
“मी पण!” बाइक वर बसता बसता विक्रम म्हणाला. “उद्या परीक्षा आहे उगाच रिस्क नको!”
“एक काम करू! ऋग्वेद, मी आणि ईशान जातो ‘वो-किंग चायनिज’ ला, तुम्ही दोघं तुमचं ठरवा! एका तासात पुन्हा इथेच भेटू!” आशुतोष त्याची बाइक सुरू करत म्हणाला.
“ट्रिपल सीट जाणार? हायवे वरून? वेड बीड लागलंय का?” श्रेयसने विचारलं आणि लगेच तोच म्हणाला, “एक काम करतो, ईशान चल तुला सोडतो मी ‘वो-किंग ‘ ला मग मी विक्रमला भेटेन, विक्रम तुझ्या हॉटेलवर जाऊया सांबार राइस खायला?!”
“ओके बॉस! भेट मला पंधरा मिनटात तिथे. चलो पोरांनो, सी यू इन सम टाईम!” असं म्हणून विक्रम जो सुसाट निघाला तो गायबच झाला.
बाकी गाड्याही निघाल्या आणि आपापल्या जेवणाच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या. जेवता जेवता सुद्धा त्यांची एकमेकांची फोना फोनी झाली आणि सिगरेट संपल्या आहेत, कोल्ड्रिंक्स घेऊन ठेऊ रात्री जागरण करताना लागेल, मॅगी आणि चीज घेऊ भूक लागली तर पटकन खाता येईल वगैरे बोलणं चालूच होतं. सुमारे दहा वाजता मुलांची जेवणं उरकली. विक्रम आणि श्रेयस वो-किंग बाहेर येऊन थांबले होते. बाहेरच्या टपरीवरून त्यांनी सिगरेटी घेतल्या. आता बाकी सामान घ्यायचं होतं. ते चोवीस तास खुल्या औषधांच्या दुकानात मिळणार असल्यामुळे मुलं निश्चिंत होती. थोडा वेळ तिथेच थांबून मुलं गप्पा मारत होती तेवढ्यात ईशानला दुपारचं बोलणं आठवलं.
“श्रेया तू दुपारी बोलला होतास मला बाइक चालवायला देशील म्हणून! चल ना आता काहीच ट्रॅफिक नाहीये!”
“बोललो होतो खरं. पण माझी बाइक नको रे. मी बेकार रेमटवलीये तिला! आशु तुझी चावी दे ना आम्ही पटकन राऊंड मारून येतो.” श्रेयस म्हणाला. आशुतोषने लगेच चावी काढून दिली आणि श्रेयस ईशानसोबत उपवन तलावाच्या दिशेने निघून गेला. इकडे बाकी तिघं मेडिकल मधून कोल्ड्रिंक्स आणि मॅगी विकत घ्यायला निघाली. श्रेयसची बाइक आशुतोषकडे होती. नितीन कंपनी जवळच्या मेडिकल स्टोअरमधून मुलांनी हवं होतं ते सामान घेतलं आणि काय करावं असा विचार करत असतानाच विक्रमचं लक्ष समोरच्या ‘अजंता बार अँड रेस्टोरंट’ कडे गेलं.
“मुलांनो एक एक स्मॉल मारायचा का?” विक्रम म्हणाला. त्याच्या डोळ्यात अचानक वेगळीच चमक आली होती.
“काय येडा झालाय का तू? उद्याचा अभ्यास झाला वाटतं सगळा?” ऋग्वेदने विचारलं.
“अरे अभ्यास काय होतच असतो रे. पटकन एक एक राऊंड मारू! ते दोघं त्यांची राऊंड मारतायत आपण आपली, काय बोलतो आशु?”
“मला न चालायला काय? आमची लास्ट एक्झाम नाहीये! तुझेच लागतील!” आशुतोष हसत म्हणाला.
“काही नाही होत रे, चल तू बिंदास!” असं म्हणून विक्रम हॉटेलच्या दिशेने चालू लागला. ह्या दोघांनी देखील एकमेकांकडे पाहिलं आणि विक्रम पाठोपाठ चालू लागले. आत त्यांना जास्त वेळ घालवायचा नव्हता त्यामुळे त्यांनी जातानाच काय प्यायचं ते ठरवलं. टेबल वर बसायच्या आधीच वेटरला एक क्वार्टर, सोडा आणि चकली-शेंगदाणे अशी ऑर्डर दिली गेली आणि तिघं निवांत टीव्ही समोरच्या टेबलवर बसले. पाचव्या मिनिटाला ग्लास भरले गेले आणि त्यांची राऊंड सुरू झाली.
“एव्हाना श्रेया आणि ईशान उपवनला राऊंड मारून घरी पोचले पण असतील ना? आणि आपण भेंडी इथे काय करतोय!” ऋग्वेद पेग तोंडाला लावत म्हणाला.
“चलता हैं रे! फोन आला तर त्यांना पण बोलावून घेऊ!” आशुतोष म्हणाला.
“तसंही ईशानमुळे उद्याच्या पेपरचे लागलेच आहेत! निदान ऐश तरी करून घेऊ!” असं म्हणता म्हणताच विक्रमचा फोन वाजला. “अरे शैतान का नाम लीया और शैतान हाजिर!” स्क्रीनवर ईशानचं नाव बघून विक्रम म्हणाला. त्याने फोन कानाला लावला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निमिषार्धात बदलले. कानावर जे शब्द पडले त्यावर नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला कळेना. इकडे हे तिघे पार्टी करत असताना तिकडे ईशान आणि श्रेयस सोबत मात्र काहीतरी विपरितच घडलं होतं.
