अमोल पालेकरांच्या ‘थोडासा रूमानी हो जाये’ या चित्रपटात नाना पाटेकरांच पात्र, त्याला जेव्हा कोणीतरी विचारत कि पाच हजारात खरंच तू पाउस आणू शकतोस का, तेव्हा खाली दिलेली पावसाची जाहिरात करतो…
वही बारिश जो आसमान से आती है
बूँदो में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है
नहरो में मचलती है, कुएँ पोखर से मिलती है, खपरालो पर गिरती है
गलियों में फिरती है, मोड़ पर संभलती है, फिर आगे निकलती है
वही बारिश, यह बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते है
उर्दू में आब, मराठी में पाणी, तमिल में तन्नी
कन्नड़ में नीर और बांग्ला में जोल कहते है
संस्कृत में जिसे वारी नीर अमृत पाए अंबु भी कहते है
ग्रीक में इसे आक्वा पूरा, अँग्रेज़ी में इससे वॉटर भी कहते है
फ्रेंच में औऊ, और केमिस्ट्री में H2O कहते है
यह पानी आँख से ढलता है तो आँसू कहलाता है
लेकिन चेहरे पे चड जाए तो रुबाब बन जाता है
कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइलओ में अपने कुएँ समेत चोरी हो जाता है
पानी तो पानी है पानी ज़िंदगानी है
इसीलिए जब रूह की नदी सुखी हो
मन का हिरण प्यासा हो, दिमाग़ में लगी हो आग
और प्यार की गागर खाली हो, तब मे हमेशा यह बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ!
आता खरंतर पावसाची जाहिरात व्हावी हि गोष्ट पचायला थोडी कठीणच.. पण जेव्हा वर्षं वर्षं पाउस होत नाही, विहिरी कोरड्या पडतात, धरणे आटतात, शेतं पाण्याविना जळून जातात, गुरं मारून पडतात. तेव्हा अगदी वर दिलीये तशी नाही पण किमान Tanker मार्फत तरी पाण्याची खरेदी करावीच लागते.
लहानपणी आम्ही आमच्या आजी-दादांकडे वालचंदनगरला मे महिन्याच्या सुट्टीत सगळे जात असू. तेव्हा आम्ही शेतात पाणी आणायला गेलो कि तिकडेच पाटाच्या पाण्यात अंघोळ करून मग कळश्या भरून आणत. मग कधी दुपारी जवळच्या कॅनलमधे म्हशीसारखे डुंबायला जायचो. तेव्हा सुद्धा आजी किंवा आजोबा “अर्रे, पाणी कमी वापरां!” असं ओरडले कीच थोडं हात आखडता घ्यायचो. वर फुशारक्या करत त्यांना सांगायचो कि आम्ही परत भरून आणू कळश्या लागल्या तर. तेव्हा लहान होतो म्हणून कळत नव्हतं. आता त्याची थोडी जाणीव व्हायला लागलीये. आपण शहरात बसून सर्रास पाणी वापरतो. गरज नसताना दिवसातून ३-३ अंघोळी करतो. Mall मधे १०० रुपये देऊन पाण्याच्या बाटल्या विकत घेतो. गावात गेलं कि पाण्याची किंमत कळते.
ह्यावर्षी होळी खेळलो नाही, गाडी सुद्धा आठवड्यातून २ वेळाच धुतली जाते. अंघोळीचं आणि माझ थोड वेगळं नातं आहे. त्यामुळे अंघोळ केली तरच काय ते पाणी वापरलं जातं! 😛 बाकी जमेल तितकं मी आणि घरचे सगळे पाण्याचा अपव्यव टाळतोय. तरी आपल्या हातून काहीतरी समाधानकारक घडावं, काहीतरी चांगलं काम करावं असं खूप वाटत होतं. जेव्हा आमीर खानच्या Paani Foundation बद्दल ऐकलं, पाहिलं आणि वाचलं, तेव्हापासून ती भावना मनात अजून वाढायला लागली होती.
एक दिवस बाहेरून घरी आलो तर आई बाबा “तुफान आलया” बघत होते. Episode संपत असताना १ मेच्या श्रामादानाबद्दल माहिती दिली गेली. ते ऐकल्या ऐकल्या ठरवलं कि काहीही झालं तरी ह्या कामाला जायचंच. मग एकट जावं लागलं तरी चालेल. त्याचं रात्री त्यांनी दिलेल्या Website वर जाऊन register केलं. तालुका इंदापूर निवडला होता, त्यामुळे जास्तीत जास्त ५-६ तास प्रवास करावा लागेल हा अंदाज ठेवला.
तीन दिवसांनी गावाचं नाव आणि तिथल्या एका Volunteerचा number असलेला message आला. गावाचं नाव होता ‘तक्रारवाडी’. थोडं मजेशीरच नाव. पण google वर शोधल्यावर कळल कि गाव भिगवण पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्या Volunteerना फोन करून थोडी विचारपूस केली तर ते म्हणले कि तुम्ही सिद्धेश्वरने आलात तरी वेळेवर पोचाल. आदल्या दिवशी राहायला येऊ नका, इकडे तशी चांगली सोय नाही. मग तसच जाऊ असं ठरवल. इतर कोणी तयार नव्हत, त्यामुळे मी एकटाच जाणार होतो. आई बाबांना सांगितल आणि ticket काढायला बसलो. Sleeper Coach ला २५०+ Waiting List. म्हणून मग AC मधलं ticket काढलं. आई थोडी ओरडली. पण मी मनात म्हणल, नको तेव्हा, नको तिथे पैसे उडवतोच, आज सत्कर्म करताना का हात मागे करायचा!
३० एप्रिलला रात्री ११ वाजता ठाणे स्टेशनवर उभा होतो तेव्हा उगाच इकडे तिकडे बघत होतो. माझ्यासारखं कोणी दिसतंय का हे शोधत होतो. गाडी पहाटे ४ वाजता भिगवणला पोचणार होती. प्रवास ५ तासाचा. मला किमान ७-८ तास तरी झोप लागतेच! 😛 ५ तासच कसं झोपायचं, म्हणून मग mobileवर २ movies बघितल्या. पहिला Movie संपवून जरा बाहेर चक्कर मारली तर कळल कि गाडी अजून पुण्यापर्यंत सुद्धा पोचली नव्हती. २ला पुण्यात पोचणारी गाडी त्या दिवशी ३:४५ वाजता गोगलगायीसारखी पुणे स्टेशनात आली. म्हणजे भिगवण यायला ६ वाजणार होते.
पण श्रमदान ६ला सुरु होणार होतं. भिगवण ते तक्रारवाडी कसं जायचं माहित नव्हतं. म्हणजे दिवसाची सुरुवात एकंदर वाईट झाली होती. ६ ला भिगवणला उतरलो आणि bridge च्या दिशेने चालू लागलो. तिथे ३-४ लोकं उभी राहून Water Cup बद्दल बोलताना कानावर पडलं. त्यांना विचारलं तर ते सुद्धा श्रमदान करायला आलेले आहेत हे कळल. मग गाव कोणतं, तुम्ही कुठून आलात, हे नेहमीचे प्रश्न झाले. माझ्यासोबत तक्रारवाडीला जायला त्यातला एक मित्र होता. असच गप्पा मारत मारत स्टेशन बाहेर पडलो तर समोर ‘Paani Foundation’ असे stickers लावलेल्या २ गाड्या उभ्या होत्या. तक्रारवाडीला जाणारे आम्ही दोनच Volunteer होतो त्यामुळे आम्हाला ह्या फुकट सेवेचा लाभ घेता आला नाही. मग टमटम rickshawमधे बसून आम्ही तक्रारवाडीकडे प्रस्थान केले.
थोड्या वेळाने ती rickshaw एका चौकात थांबली. आम्ही उतरून, पैसे देऊन वळलो तोच एक आजोबा आणि छोटा मुलगा कच्ची ढोल आणि ताशा वाजवू लागले. समोर एक कमान लावलेली, बाजूला गावाचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेल. एकूणच हे सगळ येणाऱ्या श्रमदात्यांच्या स्वागतासाठी केलेलं दिसत होत. आम्ही गावाच नाव सांगितल्यावर एक मुलगा स्कूटर घेऊन आला, आणि आम्ही दोघ त्याच्यामागे बसून गावात गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढलेली. काही ठिकाणी बायका आणि लहान मुली अजूनही रांगोळी काढण्यात मग्न होत्या. ठिकठिकाणी ‘श्रमदान’ आणि त्याखाली दिशा दाखवणारा बाण असलेले बोर्ड लावलेले.
त्या मुलाने आम्हाला एका मंदिरापाशी सोडलं आणि तो आलेला तसं माघारी गेला. आम्ही लावलेले बोर्ड शोधत श्रमदानाच्या जागी पोचलो. थोड्या अंतरावरूनच गाणी ऐकू येत होती. मधून मधून कोणीतरी काहीतरी बोलत होत. आम्ही जवळ पोचलो तसे २०-२५ हसतमुख चेहऱ्यांनी आमचं स्वागत केल. काही बायकांनी आमचं रीतसर औक्षण केलं. मग नाव नोंदणी झाली आणि आम्हाला आमचं काम सांगितल गेलं. A6 ह्या नंबरचा चर खणायचं काम मी, माझा मित्र, एक ५ जणांचं कुटुंब आणि २ आणखी श्रामादात्यांकडे होत. समान तिथेच ठेऊन आम्ही काम सुरु केलं.
धोनी किंवा विराटला जसं ओवर संपल्यावर पाणी द्यायला, किंवा नवीन bat द्यायला बारावा खेळाडू धावत असतो, तसं आमची सेवा करायला, आम्हाला पाणी, Glucon-D, Parle-G चे पुडे द्यायला, कुदळ आणि फावडं थोडं खिळखिळ झालं कि बदली करून द्यायला, आणि एकूण आमचं काम सोयीस्कर व्हावं म्हणून चिल्ली-पिल्ली पोरं धावपळ करत होती. “सर पाणी पाहिजे?” असं हसर्या चेहर्यानी तिकडे आलेल्या प्रत्येक volunteerला विचारात होती. थोडी college मधे जाणारी, किंवा आमच्या वयाची मुलं कामावर देखरेख करत होती.
त्यांना बघून उगाच माझ्या मनात एक वाईट विचार आलाच. म्हणजे आपण कितीही चांगलं करावं असं ठरवलं तरी तो एक वाईट विचार येतोच. मला असं वाटलं कि हि एवढी तरुण मंडळी इकडे आहेत, तर आम्ही एवढ्या लांबून येऊन श्रमदान करायची काय गरज आहे! पण तो विचार मागे टाकत मी खणायला सुरुवात केली. माझा मित्र माझ्यापेक्षा चांगलं काम करत होता. ते ५ जणांचं कुटुंबही त्यांना जमेल तेवढ करत होते. त्या सगळ्यांना पाहिल्यावर मलाही हुरूप आला आणि मी कामाला लागलो. थोडा वेळ काम केल्यावर आम्हाला थोडा break दिला गेला. मंडपाजवळ बोलावून पुन्हा एकदा आमचं सगळ्यांचा स्वागत करण्यात आला. त्यात आलेल्या ९० लोकांपैकी १ गृहस्थ ७७ वर्षांचे होते असं कळल. त्या आजोबांचा खास सत्कार केला गेला. ते बारामतीहून आले होते. त्यांचा उत्साह पाहून आणि एकूण तिथल्या वातावरणात असलेली positive energy पाहून आमचं पुढच काम खूप जोशात पार पडलं. आम्हाला जिकडे जमत नव्हत, आम्ही ज्यावेळी दमून खाली बसत होतो, त्यावेळी गावातले तरुण लगेच आमच्या हातून कुदळ-फावडं घेऊन काम करत होते. मग पाणी पिऊन थोडं थांबून आम्ही पुन्हा काम सुरु करत होतो.
तब्बल ३ तास काम केल्यावर १० च्या सुमारास आमचा चर खणून तयार होता. त्या संपूर्ण टेकडीवर ९० श्रमदाते आणि ५०-६० गावकरी यांनी मिळून असे किमान २०-२५ चर खणले होते. चर खणून झाल्यावर टेकडीवर पडलेले दगड धोंडे गोळा करून सगळ्यांनी मिळून एका उतारावर एक बांध घातला. हा बंध माती अडवणार आणि वाहणाऱ्या पाण्याला आम्ही बांधलेल्या चर आणि खड्ड्यांकडे वळणार आहे. हे काम संपल्यावर आम्ही सगळे पुन्हा एकदा मंडपात जमलो. तिकडे Paani Foundationचे काही लोकं होते. त्यातल्या एकाने मग आम्ही केलेल्या कामाचा आणि त्यातून गावाला किती पाणी मिळणार याचा हिशोब लावला.
आम्ही जेवढे चर खणले होते, त्यात एकावेळी ५४,००० लिटर पाणी झिरपणार आहे. म्हणजे साधारणपणे एका पावसाच्या सरीत जेवढं पाणी त्या टेकडीवर पडेल तेवढं. त्या टेकडीवर पावसाळ्यात फक्त १० सरी जरी पडल्या तरी ५,४०,००० लिटर पाणी गावाला मिळणार आहे. एक tanker एकावेळी १००० रुपये घेतो आणि १०००० लिटर पाणी देतो. आम्ही ९० लोकांनी हे काम करून त्या गावाचे ५४००० रुपये वाचवले आहेत. आणि शहराच्या हिशोबात म्हणायचा झाल तर, एक लिटर ची एक बाटली हल्ली १५ रुपयात मिलते. म्हणजे ५,४०,००० लिटर पाणी म्हणजे ८० लाखापेक्षा जास्त रुपये! हे गणित जेव्हा त्या काकांनी आमच्यापुढे मांडल तेव्हा आम्ही सगळ्यांनीच टाळ्या वाजवून स्वतःचंच कौतुक केलं. तिथे त्या गावकर्यांसोबत बसून हे सगळं ऐकताना आणि त्यांचा response बघताना मला खूप समाधान मिळालं. हा असा आनंद, असा निखळ आनंद, क्वचितच कधीतरी अनुभवायला मिळतो. ती अनुभूती मला त्या दिवशी झाली.
हे सगळं सांगून झाल्यावर, गावाच्या सरपंचानी आलेल्या सर्व लोकांसाठी वरती जेवणाची सोय केलीये असं आम्हाला सांगण्यात आल. ३ तास काम केल्यावर शेतात बसून, गावातल्या चुलीवर बनलेलं जेवण मिळण, हा जो काही आनंद आहे तो शब्दात सांगता येणं कठीण आहे. ती बटाटा रस्सा भाजी, तो गोड शिरा, खमंग तळलेल्या पुर्या आणि मनसोक्त भात!! मेनू अगदी मनाला आणि पोटाला भिडणारा होता! आम्ही दोघेही थोड्या वेळाने तुडुंब भरलेली पोटे घेऊन बाहेर पडलो. ज्या लोकांनी आम्हाला काम करताना मदत केलेली त्यांना शेवटचा निरोप दिला. पुन्हा गरज पडली आणि संधी मिळाली तर नक्की येऊ असं सांगत आम्ही गावाबाहेर पडलो. तिथे म्हणे पावस झाला कि flemingo येतात. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही केलेलं काम किती यशस्वी झालाय ते आणि flemingo बघायला एकदा पुन्हा तक्रारवाडीला जाईन असं ठरवलंय.
ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत असताना, सगळ्यांचच कुठेतरी मन भरूनही येत होतं. पण टेकडी मागे असलेल्या धरणातल्या पाण्यासारखे डोळ्यातले अश्रू देखील आटले असावेत बहुतेक. जेव्हा घरून निघालो होतो तेव्हा माझ्या डोक्यात असलेले विचार आणि परत जात होतो तेव्हा असलेले विचार ह्यात खूप मोठा फरक होता. जात होतो तेव्हा तिकडे पहाटे पोचलो तर मी safe असेन ना, काही चोरी वगैरे होणार नाही ना, तिकडची लोकं चांगली असतील ना, आपली bag चोरीला तर जाणार नाही ना, असल्या वायफळ प्रश्नांनी मनात जागा केलेली. काम संपवून तिथून निघालो तेव्हा मात्र, इकडे पाउस होईल ना, आम्ही खणलेला चर बरोबर काम करेल ना, इकडच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल ना, असे महत्वाचे प्रश्न मनात येऊ लागले.
आणलेली bag ४ तास जिथे टाकलेली त्या जागी धूळ खात पडलेली. पहाटे स्टेशनवर rickshawच काय पण Paani Foundationच्या गाड्या सुद्धा होत्या. गावातल्या एकही व्यक्तीने आलेल्या ९० लोकांचा गोड शब्दात सुद्धा अपमान केला नाही किंवा गाव आणि शहर तुलना करून टोमणे-शेरे मारले नाहीत. उदाहरण म्हणून, मंडपात मी बसायला गेलो तर एका आजोबांनी उठून मला त्यांची खुर्ची देऊ केली. मी ती नाकारून खाली बसलो तर आजूबाजूचे लोकं ‘ओ तुम्ही नका खाली बसू! वर बसा!’ असा आग्रह करत होते. हा सगळा पाहुणचार अगदीच भारावून टाकणारा होता.
एकूणच काय, तर पाण्यावरून तिसरं महायुद्ध होणार हे भाकीत साफ खोटं ठरवत आज शहरं आणि गावं एकत्र येत आहेत. आणि नुसतं बसून चर्चा न करता काम करत आहेत. आता पाउस पडणं, न पडणं हा निसर्गाचा खेळ आहे. त्यात नशिबही साथ देऊ शकत नाही. पण महाराष्ट दुष्काळमुक्त व्हावा, इथल्या शेतकर्यांना पाण्यामुळे तोटा होऊ नये, म्हणून सुरु केलेला हा श्रमदानाचा प्रयत्न खरंच चांगला आहे! नाहीतरी आपण सुट्टी कशी घालवावी असं म्हणत म्हणत सुट्टी वाया घालवतो. नाहीतर महागड्या जागी जाऊन, महाग खाऊन पिऊन, खोटं सुख मिळवतो. त्या पेक्षा संधी मिळेल तेव्हा अश्या प्रकल्पामध्ये सहभागी होऊन खर्या निखळ आनंदाची अनुभूती घेता येऊ शकते.
शेवट तक्रारवाडीने केलेल्या कानडी भाषेतील गर्जनेने करतो. “अन्न गुड्गुडे, नाल गुड्गुडे.. धिश्क्याव!” त्याचा अर्थ, अन्न आणि पाण्याचा हा जो तुटवडा आहे, त्याला आम्ही एकजुटीने सामोरे जाऊन त्यावर मात करू आणि यशस्वी होऊ!!
आणि पुन्हा कोणाला पाउस (पाणी) विकावा आणि विकत घ्यावा लागू नये ही एकच प्रार्थना! जय हिंद! भारत माता की जय!


Nice post. Keep it up
LikeLike
Good one! probably the one I liked the most! Keep up the good work!
LikeLike
Hi Abhi Lekh mast ahe and congratulations for your efforts
LikeLike
Wow Abhi amazing dear I am quiet impressed with you and offcourse with Paani Foundation. The words you have used is very apt and precise. Overall proud of your work and wuld definitely try to give my small contribution asap
LikeLiked by 1 person
Abhi Nice blog. Actually as I told you I was also inspired by Pani Foundation’s appeal to join this mission but being our marriage anniversary you insisted that I should be here with Aai. But reading your blog I feel that I missed the opportunity. Anyways once again I must say your blog is quite inspirational.
LikeLiked by 1 person