अडगळ, कीती अजब गोष्ट आहे बघा ना! म्हणजे खरतर एखादी वस्तू अडगळीत पडून रहायचं काही कारण नाही. कारण अडगळीत गेलेली प्रत्येक वस्तू ही कधीतरी आपल्याला फार हवीहवीशी असते. पण काळाच्या ओघात, आणि बदलत्या आवडीनिवडींच्या चक्रव्यूहात ह्या वस्तू अडकतात आणि शेवटी घराच्या एखाद्या दरवाज्यामागे, माळ्यावर किंवा बालकनीतल्या एका कोपर्यात पडून राहतात. काही महिन्यातच त्यावर इतकी धुळ-माती बसते की त्यांचा वापर सोडा साधा हात लावायलादेखील आपण नाही म्हणतो.
अश्या दुर्लक्षित, उपेक्षित अवस्थेत काही वर्ष घालवल्यावर कधीतरी मग “घर स्वच्छता अभियान” सुरू होतं आणि आपलं लक्ष घराच्या त्या कोनाड्याकडे जातं. अभियानाचा म्होरक्या (आमच्या घरात बाबा) एकएक वस्तू बाहेर काढतो आणि आपण ह्यावर का त्यावेळी इतका वेळ आणि पैसे वाया घालवले असं वाटायला लागतं. किंवा कधीतरी त्या वस्तूंशी जोडलेल्या आठवणींनी आपण भारावून जातो. ही सगळी अडगळच असते. माहित असतं आपल्याला की ह्या गोष्टींचा आता काही उपयोग नाही. तरी आपण त्या भंगारवाल्याच्या स्वाधीन करताना त्याच्याशी ५-१० मिनिटं हुज्जत घालून ५०-१०० रूपये जास्त मागून घेतो. का असं होत असेल? म्हणजे निरूपयोगी वस्तूंचासुध्दा मोबदला मिळावा अशी का अपेक्षा असते? आणि जर भौतिक गोष्टी आपण सहज सोडत नाही, तर मानसिक गोष्टींचं काय??
ह्या सगळ्याचा विचार करताना मला असं जाणवलं की आपण साध्या भाषेत सांगायचं तर हवरट असतो. भौतिक सुखासाठी तर असतोच, पण मानसिक सुखासाठीही. आणि सुखाची व्याख्या काळानुरूप बदलत असते. त्यामुळे ही भावनांची अडगळही दिवसागणिक वाढत जाते. घरातल्या अडगळीसारखंच ह्याकडे आपण सतत दुर्लक्ष करत राहतो. डोक्याच्या कोनाड्यात या भावना एकमेकांवर पडतात, आदळतात, आपटतात, फुटतात. तरी आपण त्याकडे कानाडोळा करतो. डोळ्याआड जाव्या म्हणून त्यावर जुनी चादर टाकून ठेवतो.
आणि मग एक दिवस ही चादर ओढलेली भुतं आपल्याला कवटाळतात आणि आपण खडबडून जागे होतो. त्याची विल्हेवाट लावायचे बरेच उपाय आहेत. तरी ते करताना आपण फार संकोच करतो. कुठेतरी एका कोनाड्यात पडलेली कोणाशीतरी झालेल्या त्या भांडणाची आठवण, त्यावर उपाय ठाऊक असतो आपल्याला. नीट बोलून प्रश्न सुटणार होता, किंवा अजूनही सुटेल हे माहीत असतं. पण इकडे येते ती भंगारवाल्याशी हुज्जत घालण्याची आपली सवय. आणि ह्या सवयीमागे लपलेला अहंकार. “मी का बोलायला जावू?” असं आपल्यातला अहंकार म्हणतो. मग ती आठवण आपण एकतर गोंजारत बसतो, किंवा पुन्हा चादरीखाली लपवुन टाकतो. आणि ह्यातून निष्पन्न शुन्य.
मग ह्यावर उपाय काय? गोष्टी आणि भावना संचित करणारे आपण, त्या अडगळीत ढकलणारे आपण, पून्हा उकरून बाहेर काढणारेही आपणचं. मग त्या बाहेर काढून गोंजारत बसायचं, पुन्हा त्यावर चादर ओढायची की जसं आपण आपला जुना रेडियो १०० ऐवजी तडजोड करुन ५० रूपयांना देऊन टाकतो तसं थोडीशी तडजोड करुन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा??
विचार करुन बघा, उत्तर साेपं आहे.. 🙂 मला घरसफाई करताना हे सुचलं म्हणून मुद्दाम लिहायला बसलो. आता आमचं घर आणि माझं डोकं काहीअंशी अडगळमुक्त झालयं. तरी बराच कचरा आहे. पण तोही हळूहळू फेकला जाईल अशी आशा करतो आणि थांबतो.
पोस्ट वाचून तुमचा दिवस अधिक चांगला होवो ही सदिच्छा! 🙂
Abhijeet Jog
